मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

कलावंत......


कलावंत असतो का, इतरांपासून वेगळा? 

अपयशाच्या भितीने येतो ना त्याच्या पोटात गोळा? 


त्याच्यात असेल इतरांपेक्षा, थोडी अधिक सजगता

पण इतरासांरखीच असत त्याच्या दुःखाची गुणवत्ता! 


कलावंताला जर मोठी, महत्वाकांक्षा असेल

तर मग तो खरा कलावंत कसा असेल?


कलाकार असतात का, कलेचे व्यापारी? 

करतात ना कलेचे प्रयोग  घेऊन सुपारी? 


कलावंत का असतो, अधीर आणि व्याकुळ? 

त्याच्या काळजात कशासाठी हंबरते गोकुळ?


कलावंत आणि रसिकांचे, जेव्हा संपते विभाजन

तेव्हा खऱ्या कलेचे , समजून येते प्रयोजन! 


                               कवी - नवनाथ ठोंबरे


शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

तु.....

माझ्या मनातील सतारीची

हळुवार तार तू

अन काळजाला चिरणारी

हसरी कट्यार तू


ओबडधोबड जिंदगीला

चिऱ्यासारखा आकार तू

बघ युद्धावर निघालोय प्रेमाच्या

माझी ढाल अन तळपती तलवार तू


माझ्या लिखाणातील आशय

ओघवतेपणा अन सार तू

धगधगत्या मनातील 

विद्रोहाचा अंगार तू


तुडवतोय समतेच्या वाटा 

एकमेव साक्षीदार तू

सारे जग विषमतेने ओसंडून वाहताना

माझा समानतेचा दरबार तू


माझी भक्ती,माझी भावना,माझी साधना 

सारं काही अपार तू

माझ्या मनातील अमूर्त ईश्वराचा

मूर्त आकार तू


हे #कविते माझ्या जीवनाचा

उपहार तू

तूच जीवन,तूच मरण,तूच तपश्चर्या

अन माझ्या जीवनाचा अलंकार तू

नवनाथ ठोंबरे

शब्द......

काही शब्द असे असतात|

जे हृदयाला स्पर्श करतात||

शब्द चांगले असोत की वाईट|

कधीच बोलायचे नसतात घाईत||

बोलणाऱ्यांच्या जिभेला हाड नसते|

ऐकणाऱ्यांचे मात्र सारे लक्षच तिकडे असते||

शब्द हेच शस्त्र अन् अस्त्र असतात|

उगाच फुकट बोलायचे नसतात||

आपले शब्द नेहमीच असावेत मवाळ|

कृती मात्र असावी जहाल||

बोलणाऱ्यांचे शब्द आणि ऐकणाऱ्यांचे कान|

दोघेही करीत असतात सारखीच घाण||

करू नये शब्दांचा वापर शस्त्राप्रमाणे|

नाहीतर अवस्था होईल श्वानाप्रमाणे||

"ना घर का,ना घाट का" हेच जीवन नसते|

तर आपल्या मधुर वाणीने ते फुलवायचे असते||

शब्द हे माणसाला आकाशाला भिडवतात|

आणि कधी कधी हेच तळागाळात नेतात||

अनेक अक्षरांचा मिळून बनत असतो शब्द|

त्याचा उपयोग करावा विचारबद्ध||

शब्दांशिवाय अपूर्ण आहे संवाद|

ह्यांच्या चुकीच्या वापराने होतात वादावाद||

शब्द हीच माणसाची असते खरी संपत्ती|

कधी-कधी हीच निर्माण करते आपत्ती

 नवनाथ ठोंबरे 

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

तु आणि मी

तु माझा प्रियकर!

मी तुझी प्रेयसी!!


तु प्रेम करणारा!

मी काळजी करणारी!!


तु कवितेतील शब्द!

मी शब्दांची कविता!!


तु गुलाबाच फ़ुल!

मी गुलाबाच्या पाकळया!!


तु माझा किनारा!

मी तुझी नदी!!


तु समजुन घेणारा!

मी निभावुन नेणारी!!


तु शब्दांची कविता!

मी शब्दांच्या भावना!!


तु माझा दिवा! 

मी दिव्याची वात!!


तु   हसवणारा!

मी  रडणारी!!


तु समजावणारा!

मी रुसणारी!!


तु प्रेमाचे गीत!

मी गीताचे सुर!!


तु नदीकाठावरील नाव!

मी शब्दसौंदर्याच गाव!!


तु व्यक्त होणारा!

मी अव्यक्त राहणारी!!

  

तु माझा प्रियकर!

मी तुझी प्रेयसी!!


                  माझा छोटासा प्रयत्न

पुर्वीच माझ गाव



वड होत,पिंपळ होता;

होता छान झरा

गावाकडच्या मातीचा

गार होता वारा


तास होता;घास होता

डोईवर भारा

गाईगुरासाठी यायचा

शेतातून चारा


चूल होती;मुलं होत

आजी होती घरा

आजोबाचा चढायचा

चुकून कधी पारा


वेस होती;रेष होती

हटकायचे पोरा

गावगाडा जपायचे

सगळेच न्यारा


गढी होती,होता वाडा

रुबाबाचा तोरा

गावाच्या कारभाराचा

जमाखर्च सारा

             नवनाथ ठोंबरे

संसार

 गेली रात सरून

संसार जागा झाला

घरोट्यावर देव माह्या

अंधार भुलून गेला


जाता,जाता,जाता कुठं

जात थांबल माहं

नको देऊ कणगीभर

घासापुरत मागणं माहं


देऊ नको चार खोपी

खोपा माहा बरा आहे

देवडीतल्या दिव्यासाठी

तुचं तर जागा आहे


कायजाच्या कायजीन

तगमग जिवाची

नाही दोष तुले बापा

फळ भोगते नशिबाची


उधयून उधयीची

जात माणसाची माही

तुनं दिल्या काळोखाची

फिटली नवलाई माही

             नवनाथ ठोंबरे

आई बाबा

शिकतो जेव्हा अ,आ,ई
तेव्हा दप्तर होते आई
माझ्या गंधासाठी सुगंधी
तू अत्तर होते आई

प्रश्न होते कठीण तेव्हा
आठवते मजला आई
अडल्या प्रश्नाचे कसे ग
सोपे उत्तर होते आई

जगताना उसवत जातो
तेव्हा अस्तर होते आई
जरा कुठे मी चुकल्यावर
कशी फत्तर होते आई

शाळेनंतर सांग कशी ग?
माझी मास्तर होते आई
जळमटेसारी पुसण्यासाठी
कधी डस्टर होते आई

देह जरी असेल हा नश्वर
तू तर ईश्वर होतेस ग आई
तुझ्याच गंधाने बाबा माझे
परमेश्वर होतात ग आई
              
               नवनाथ ठोंबरे
                औरंगाबाद

गुरुवार, १४ मे, २०२०

पेरणी...

केली पेरणी पेरणी
काळ्या शेतामध्ये छान
पंढरीच्या विठूराया
द्यावे पावसाचे दान..... ॥१॥
माझे ढवळ्या-पवळ्या
संगे चिमणी-पाखरं
गाणे गातात मस्तीने
सारी माझीच लेकरं..... ॥२॥
काळ्या-काळ्या ढेकळांना
लागे पावसाची आस
तरी कोसळेना नभ
फक्त होतसे आभास..... ॥३॥
यावे वरूणाने आता
बीज सुकायच्याआधी
द्यावे भरपूर पाणी
कोंब अंकुरण्याआधी..... ॥४॥
शेतामध्ये पसरला
सारा कष्टाचाच घाम
अवंदाच्या वर्षी तरी
मिळो मनाजोगा दाम..... ॥५॥
कष्ट करून जोमाने
पुन्हा फुलावे शिवार
काळ्या आईच्या कुशीत
सारे भिजावे आवार..... ॥६॥
यावा मृग लवकर
जावी मोहोरून शेती
याव्या पावसाच्या धारा
ओली व्हावी काळी माती..... ॥७॥

                   
                        लेखक - नवनाथ ठोंबरे
                                   औरंगाबाद

प्रेम............


प्रेम म्हणजे एक गंमत
तिखट गोड क्षणाची सुरेख संगत
प्रेम म्हणजे एक मजा
परीक्षा नावाच्या गोष्टीच्या सजा
प्रेम म्हणजे एक अपेक्षा भंग
अशक्य मिळवण्यात सदैव दंग
प्रेम म्हणजे एक गार वारा
उनाळ्यात पाऊस अन गारा
प्रेम म्हणजे एक संधी
कधीतरी येते दुःखाची मंदी
प्रेम म्हणजे एक सुगंध
अनपेक्षित सूत्राचा ऋणानुबंध
प्रेम म्हणजे एक आचार्य
कधीच न कळणार तात्पर्य
प्रेम म्हणजे एक व्यथा
जगण्या मरण्याची छान कथा
प्रेम म्हणजे एक आशा
पदरी न पडण्याची निराशा
प्रेम म्हणजे एक टोळका
अनेक विचारवंताचा घोळका
प्रेम नावाची गोष्ट अगदीच क्लिष्ट
काहींसाठी स्पष्ट तर काहींसाठी कष्ट

                            नवनाथ ठोंबरे
                              औरंगाबाद

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

उघड्यावरचा संसार.....


बघा मांडला संसार
निळ्या आभाळाच्या खाली
असा उघडा - बोडका
नाही घर, नाही वाली..... {१}

चंद्र - चांदणे पांघरू                                 
घेऊ नभाची चादर                                             
दुःख येता जीवनात
असू लढण्या सादर..... {२}

गरजेपुरती भांडी
अंग झाकाया कपडे
चिंता आमची देवाला
आम्ही गरीब - बापडे..... {३}

गुरे, वासरे सोबती
भटकंती होई नित्य
गरीबाला नाही कोणी
हेच आहे एक सत्य..... {४}

माया आईची न्यारीच
तान्ही मुले पदरात
अन्न मिळाया पोटाला
बाप राबे शिवारात..... {५}

अंधाराची नाही तमा
उन्हाळ्याच्या नाही झळा
नसे थंडीची काळजी
सोसू आनंदाने कळा..... {६}

नशीबाने जरी आम्ही
गरीबीत रे जन्मलो
तरी मनी निरंतर
आम्ही श्रीमंत जगलो
                 
                                    लेखक - नवनाथ ठोंबरे 

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

माणसा हा जन्म पुन्हा नाही............!



अरे अरे माणसा काय झाली आहे रे तुझी दुर्दशा
छोट्याशा विषाणू ने संपवली तुझी जगण्याची नशा

निसर्गावर मात करून मारलीस तू चंद्रावर उडी
निसर्गानेच बघ कशी जिरवली तुझी खोडी

मोठमोठ्या यंत्रामध्ये  तू स्वतः ला गुंतवले
यंत्रांनी तुझे आता जगणे कसे संपवले

माणूस म्हणून माणसाला कधी दिला नाही वेळ
नाही राहिला माणसात आता जगण्याचा मेळ

पूर्वी म्हणे हात जोडून करायचे नमस्कार
आपलेच आता आपल्याचा  करू लागले तिरस्कार

उच्च जीवन जगण्याच्या नादात माणूस झाला होता धुंद
निसर्गापुढे बघा झालेत कसे मंद

संपत्ती कमविन्याच्या पडले होते मोहात
सगळेच पडू लागले आता मृत्यूच्या डोहात

पशू पक्षी बंद करून ठेवले होते पिंजऱ्यात
तेच आता डोकावून पाह तात घराच्या उंबऱ्यात

एक मेकांच्या पुढे जाण्यात झाले होते मग्न
दवाखान्यात मोजू शकत नाही आता रुग्ण

खेड्यात आणि शहरात वाढू लागली दरी
आता कसे म्हणू लागलेत आपली खेडीच बरी

खेड्यातील लोकासाठी आटला होता प्रेमाचा झरा
आता सगळ्यांनाच वाटू लागले  खेड्यातला माणूस बरा

नियतीने करून टाकला माणसाचा खेळ
कसा रे बसेल आता तुझ्या जगण्याचा मेळ

अंगा अंगात बघा भिनलाय आळस
टीव्ही आणि इंटरनेटने  गाठलाय त्याचा कळस

सगळेच आता दान धर्म करण्याची  भाषा बोलतात
परमेश्वरच आपला  तारणहार  म्हणून प्रार्थना करतात

माणसाला राहिली नाही आता माणसाची किंमत
प्रत्येकाने ठेवली पाहिजे घरात बसायची हिंमत


                           
                                    लेखक - नवनाथ ठोंबरे
                                              औरंगाबाद