बुधवार, २२ एप्रिल, २०२०

उघड्यावरचा संसार.....


बघा मांडला संसार
निळ्या आभाळाच्या खाली
असा उघडा - बोडका
नाही घर, नाही वाली..... {१}

चंद्र - चांदणे पांघरू                                 
घेऊ नभाची चादर                                             
दुःख येता जीवनात
असू लढण्या सादर..... {२}

गरजेपुरती भांडी
अंग झाकाया कपडे
चिंता आमची देवाला
आम्ही गरीब - बापडे..... {३}

गुरे, वासरे सोबती
भटकंती होई नित्य
गरीबाला नाही कोणी
हेच आहे एक सत्य..... {४}

माया आईची न्यारीच
तान्ही मुले पदरात
अन्न मिळाया पोटाला
बाप राबे शिवारात..... {५}

अंधाराची नाही तमा
उन्हाळ्याच्या नाही झळा
नसे थंडीची काळजी
सोसू आनंदाने कळा..... {६}

नशीबाने जरी आम्ही
गरीबीत रे जन्मलो
तरी मनी निरंतर
आम्ही श्रीमंत जगलो
                 
                                    लेखक - नवनाथ ठोंबरे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा