तूच घडविलेस ना सारे,
मग का घडविलीस मीरा?
रूक्मिणीला दिलास कृष्ण
कृष्णाला दिलीस राधा,
उरल्या सुरल्या गोपीकाही
आणि हा संसारच सारा
अनघेला दिलास दत्त
दत्तातील प्रत्येकां दिलीस,
सरस्वती,लक्ष्मी,पार्वती
ओतप्रोत आशीर्वाद खरा
चिमणीसाठी आहे चिमणा
वादळासाठी असे वारा,
भिंगरीसाठी आहे भोवरा
मानवांसाठी घडविली दारा
मीरेस दिलीस मात्र भक्ती
नुसती तोंडाला पाने पुसली,
जगापुढे मांडलास देखावा
एकलेपणा देऊनि बोचरा
वर म्हणसी भक्तीच श्रेष्ठ
मग कृष्ण रुक्मिणी,अनघादत्त,
विष्णू लक्ष्मी आहे का कनिष्ट?
न कळणारा तुझा पसारा
तूच घडविलेस ना सारे,
मग का घडविलीस मीरा?
कवी- नवनाथ ठोंबरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा