औरंगाबाद पासून काही अंतरावरच माझे आजोळ.....
सुट्टीत माझा मुक्काम हमखास आजोळी असे. मोठ्ठं घर, घरापुढे अंगण, घरापासून जवळच अनेक एकरात पसरलेले शेत. पहाटेची कोंबड्याची बांग, पक्षांची किलबिल , औरंगाबाद सहसा विरळा असे शांत, प्रसन्न,आल्हाददायकवा वातावरण, आजीची लगबग पहाटेपासूनच सुरू होई. चूल पेटवून तांब्याच्या तपेलीत आंघोळीसाठी पाणी तापत ठेवणे, दुसऱ्या चुलीवर चहाचं आधण.
लावणीच्या हंगामात शेतात काम करण्यासाठी जे मजूर येत ,त्यांना न्याहारी द्यावी लागे मग आजी भल्या पहाटे उठून त्यांच्यासाठी भाकऱ्या भाजत असे.
भाकरी सोबत तव्यावर परतून केलेली कांदा -सुकट, कांदा -बटाटा,किंवा सुक्या मेथीची भाजी आणि चहा अशी तयारी असे. मी उठेपर्यंत आजीचे सारे काम आवरून होई . औरंगाबाद मध्ये सवय म्हणून मी टूथपेस्ट वापरत असे पण माझ्या आजोळी खरं तर करंज,कडुनिंब अथवा बाभळीच्या काडीनेच दात स्वच्छ करत.
आजोबांनी तर कधीही टूथपेस्ट वापरली नाही. ते नेहमी करंजाची किंवा कडुनिंबाची काडीच वापरत.आजोबांचे दात वयाची सत्तरी पार केल्यानंतरही मोत्या सारखे शुभ्र आणि निरोगी होते.
मे महिन्यात सकाळी न्याहारीला गोड आंब्याच्या फोडीही असत. आमच्याकडे दुभत्या गाई होत्या.
मामा दुधाची चरवी घेऊन दूध काढण्यासाठी निघाला, की मीही त्याच्या मागे मागे असे. आमच्या 'लक्ष्मी' गाईच्या वासराशी माझी गट्टी होती. तिचे वासरू फार गोंडस होते, त्याचे ते टपोरे ,पाणीदार,निरागस डोळे जणू अथांग डोह.
मी त्याला 'छकुल्या' म्हणत असे. 'लक्ष्मी' एरवी कुणाला तिच्या वासरा जवळ फिरकूही देत नसे पण मला मात्र ती मुभा होती. मी छकुल्याच्या गळ्यात गळा घालून खेळत असे.
गाईचे दूध भांड्यात पडताना चुळ s s चुळ असा लयबध्द आवाज येई. आजीने नुकत्याच तव्यावरून पानात वाढलेल्या भाकऱ्या ,आंब्याच्या मधुर फोडी, मोठी वाटीभरून ताजी साय आणि त्यात आजीच्या मायेने घातलेली साखर ह्यावर येथेच्छ ताव मारून आमची स्वारी खेळायला अंगणात येई. आम्ही आते-मामे ,भावंड मिळून दिवसभर धुमाकुळ घालत असू. लगोरी,लंगडी, पकडा पकडी . आजीच्या परसदारी एक मोठ्ठं वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्यांची गाठ बांधून त्यावर झोके घेणे हा तर आवडता खेळ.कित्येक वेळा ती गाठ सुटल्यामुळे किंवा पारंब्या तुटल्यामुळे, वडाच्या मुळांवर आपटून पार्श्वभागावर सडकून प्रसाद मिळे.
त्या वडाच्या पायथ्याशी आमची भातुकली रंगत असे.
विटकराची चूल,वडाच्या आणि पळसाच्या पानांच्या द्रोणाची भांडी, चुरमुरे,शेंगदाणे, गूळ
हा स्वयंपाक, मग वडाच्या पानात आणि वडाच्या सावलीत आमची अंगत-पंगत बसे.
जवळच्या डोंगरावर जा,करवंदाच्या जाळीत घुसून करवंद खा, जांभळाचे झाड गदा गदा हलवून जांभळे पाड. एखादा मुलगा झाडावर चढे आणि जांभळं खाली फेके मग आणि मुली त्या पटापटा फ्रॉकच्या ओच्यात भरून घेत असे, आमचे कपडे जांभळ्या रंगात रंगून निघत.
सगळी शेतं माझ्या चुलत आजोबांच्या आणि माझ्या आजोबांच्या मालकीची त्यामुळे आम्हा मुलांचा सगळीकडे मुक्त संचार असे. कुणाच्या झाडावरच्या कैऱ्याच तोड, कुठे पेरूच्या झाडावर चढून तिथले पेरू त्याच फांदीवर बसून कराकरा खा, गाभुळलेल्या चिंचा मिटक्या मारीत खा,बोरीचे झाड हलवून बोरेच पाड असा माकडांना लाजवेल असा धुडगुस आम्ही घालत असू.
एखादी मामी,
माजघराच्या खिडकीतून हे पाही, मग मला घरात बोलवून ओजोळी आलेल्या भाच्याला, घरातलं ताजं दूध, साखर-वेलचीपूड घालून मोठ्या प्रेमाने प्यायला देई. तिथेच आंबे साफ करत बसलेली चुलत आजी "कधी आलास रे बाबा तू ? माझी लेक बरी आहे ना ?"..... अशी आईची चौकशी करे. वारा प्यायलेल्या वासरा सारखे उंडारून मी घरी परत यायचे तेव्हा माझा अवतार पाहण्यासारखा असे. मुळचा गुलाबी सदरा काळा जांभळा झालेला ,तोंड अर्धे जांभळे,हात काळेकुट्ट.
माझी मावशी तो अवतार बघून पाठीत एक धपाटा घाली आणि मला पुन्हा आंघोळ घालायला नेई.
दुपारच्या जेवणानंतर, साधारण तीन चारच्या सुमारास आजी, आजोबा,मामा सारे शेतात कामासाठी निघत. कधी कधी मीही त्यांच्या सोबत जात असे. मामा मोटर सुरू करुन मळा शिंपण्याचे काम सुरू करी त्यात माझी लुडबुड असायचीच. मी कारल्याच्या,दुध्याच्या मांडवात बागडत असे. मांडवावर लोंबकळत असलेले पडवळ,दोडके,माझ्या डोक्यात टपल्या मारीत.
डेलिया, अबोली,मोगरा,गुलाब,जाई, अशी कितीतरी फुलं.
काळी जांभळी वांगी, लाल भोपळा, दोडके,पडवळ,कारली, मिरच्या,दुधी,कोबी, गवार,कोथिंबीर,टॉमेटो आणि इतर अनेक भाज्या. बांधावर हारीने उभी असलेली आंबा,चिंच,डाळींब,
पेरूची झाडे. ह्यात बागडताना संध्याकाळ कधी होई कळतही नसे.आमच्या शेतात वर्षानुवर्षांपासून काम करणारा 'माणिक मामा' घरी जाण्यासाठी हात पाय धुवायला घेई.
मग मध्येच काहीतरी सुचून मला विचारे....."पोरा ताडगोळे खाणार गो ? " आणि मग सराईतपणे ताडाच्या झाडावर चढून ताडफळे काढीत असे. त्या ताडगोळ्यांची गोडी खरचं अवीट होती.
शेतातून घरी येताना आजी शेवग्याच्या शेंगा, वांगी,मिरच्या,वाल पापड्या, घेऊन येई. तांदळाच्या भाकऱ्या, शेवग्याच्या शेंगा घालून केलेली वाल -वांग्याची भाजी, चिंच कढी आणि भात असा साधा परंतु अतिशय रुचकर स्वयंपाक असे.
आजी अन्नपूर्णा होती.अचानक पाहुणे आले तरी तिने रांधलेला स्वयंपाक कधी कमी पडला नाही. हाताला अमृताची चव ! आजीने पाण्याला फोडणी द्यावी आणि त्यानेही खाणारा तृप्त व्हावा. शेतातून नुकत्याच खुडून आणलेल्या त्या वालपापडी,शेवग्याच्या शेंगा घालून केलेल्या वांग्याच्या भाजीची अप्रतिम चव कितीही पैसे मोजले तरी पुन्हा मिळणार नाही.
चुलीवर रटा रटा शिजणाऱ्या भातामध्ये कधी कधी आजी गावठी अंडी सोडून देई. भाता बरोबर तीही उकडून होत. तिने बऱ्याच कोंबड्या पाळल्या होत्या. ह्या कोंबड्यांची मला लहानपणी फार गंमत वाटे. त्यांना अंडी घालण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या सवयीचीच जागा लागते.आमची एक कोंबडी माझ्या आजोबांच्या पलंगावर, बरोबर पलंगाच्या मध्यभागी बसून अंडे घाली. ती अंड्यावर आली आणि आजोबांच्या खोलीत जाऊन, वाऱ्यावर हलणारी बाहुली जशी मान मागे पुढे हलवते तशी मान हलवत, कक्क क्कक s s s क्क्व असा आवाज करीत येरझाऱ्या घालू लागली की पलंगावर जरा निवांत पडलेले आजोबा, बिचारे निमूट उठून बाहेर जात मग कोंबडी ताई टुनकण् उडी मारून पलंगावर बसे.
दुसरी कोंबडी वापरात नसलेल्या चुलीत बसूनच अंडी घाली त्यामुळे आजीला ती वापरात नसलेली चूल मोडता आली नाही. ती तशीच ठेवावी लागली नाहीतर कोंबडीताई कासावीस झाल्या असत्या.
आमचे एक बैलोबा सुध्धा फार सोवळे होते. शेती म्हटली म्हणजे बैलजोडी आलीच. मामाकडेही फार सुरेख खिल्लारी जोडी होती. गुरांसाठी पाण्याचा मोठा हौद बांधलेला होता. इतर सगळी गुरे त्या हौदावर पाणी पीत परंतु आमच्या बैल जोडीतल्या एका बैलाला उष्टे पाणी चालत नसे.तो कधीही त्या हौदावर पाणी प्यायला नाही. त्याला वेगळ्या बादलीत दिलेले पाणीही चालत नसे. मामा स्टीलची बादली त्याच्या समोर स्वच्छ घासत असे मग बोरवेल चे पाणी त्याच्या समोरच काढावे लागे. तेव्हा कुठे महाराज पाणी पित नाहीतर तो पाण्याला शिवत देखील नसे. फार हट्टी होते साहेब.
गॅस ची शेगडी असली तरी काही पदार्थ मात्र चुलीवरच होत. बहुधा ते पदार्थ चुलीवर अधिक चविष्ट होत असावेत. घरची भातशेती असल्यामुळे असेल कदाचित, खाद्यपदार्थात तांदळाचा वापर अधिक . तांदुळ पीठात दूध - तूप आणि गूळ घालून केळीच्या पानात भाजलेली गोड भाकरी
किंवा तांदळाचे पीठ,ओले बोंबील,केळफूल,हिरव्या मिरच्या घालून केळीच्या पानावर निखारे ठेवून भाजलेली झणझणीत तिखट ,जाडसर भाकरी. चुलीवर केळीच्या पानात खरपूस भाजलेल्या त्या भाकरीचा स्वाद केवळ अवर्णनीय.
आजोबांच्या शेतावर कामासाठी येणारा 'गोप्या' मामा कधी कधी त्याने खाडीतून पकडलेले मासे आणून देई. पळसाच्या हिरव्यागार पानात टणाटणा उड्या मारणारी ताजी कोलंबी किंवा चांदीचा वर्ख लावल्यासारखे चमचमणारे इतर ताजेताजे मासे. त्यावेळी अंगणात दिमाखात ऊन खात पहुडलेल्या दोन-तीन मनिमाऊ, माशांचा सुगावा लागताच धावतपळत स्वयंपाकघरात येत आणि लडिवाळ आवाजात म्याव- म्यावं करत आजीच्या पायात घोटाळत. मांजरी जास्तच पायात येऊ लागल्या की आजी ओरडे "लांब बसा ग भवान्यानो"....... मांजरीही मोठ्या चलाख त्यांना आजीने सांगितलेले बरोबर कळत असे. ती ओरडली, की निमूट जाऊन चुलीच्या उबेलगत बसून राहत. मस्याहाराचा पाहिला मान त्यांचाच असे. रांजणात मीठाच्या पाण्यात खारवण्यासाठी ठेवलेल्या कैऱ्या किंवा परसात लावलेली नवधारी भेंडी घालून चुलीवर शिजवलेल्या त्या कोलंबी-भेंडा अथवा कोलंबी-आंबा कालवणाची चव काय वर्णावी ?
भात शेतीच्या हंगामात लावणी,कापणी,मळणी, इत्यादी अनेक टप्पे पार पाडीत भाताच्या पिवळ्याधम्मक राशी खळ्यात जमा व्हायच्या. शेतकऱ्याच्या पदरात निसर्गाने भरभरून टाकलेलं ते सोन्याचं दान
पाहून मन हरखून जाई. भातगिरणी वरून भात भरडून आले की थोडे तांदुळ आजी पोहे करण्यासाठी भिजत घालीत असे. आजीच्या राज्यात पोहे,अंडी,लोणचे,भाज्या,तांदुळ,
पापड,रोजच्या वापरातले मसाले हे सगळे कधीचं विकत आणले नाही.
उन्हाळ्यात ही सगळी बेगमीची कामे होत. लोणच्यासाठी
हळद- मीठ लावून उन्हात वाळवत घातलेल्या कैऱ्यांच्या फोडी येता जाता मटकावणे हा आम्हा पोरासोरांचा आवडता उद्योग होता.
आमच्या घरचे पापड करायचे असले की तो निरोप सगळ्यांना पोहचवण्याचे काम माझेच असे. आदल्या रात्री मावशी आणि आजी उडदाच्या पिठात पापडखार मिसळून उखळात ते कुटून ठेवत. हे मोठे कौशल्याचे काम, वरून येणारा मुसळाचा आघात चुकवत पीठ खालीवर करायचे. सकाळी सगळ्या मावश्या, माम्या आपापली पोळपाट लाटणी घेऊन येत. भराभर वाटोळे,पारदर्शक पापड लाटले जात. ते उन्हात वाळत घालण्याचे आणि कावळेदादा पासून पापडांचे रक्षण करण्याचं महत्वाचं काम आम्हा मुलांकडेच असायचे.
आजोबांच्या शेतात
आंब्याची भरपूर झाडे होती त्यातली काही झाडे उत्तर भारतीय लोकं आंब्याच्या हंगामापर्यंत भाड्याने घेत. आजोबांकडे एक 'दयाशंकर चाचा' दरवर्षी येत . ते आंब्याची झाडे पसंत करून पैसे देऊन जात आणि काही दिवसांनी आंबे झाडावरून उतरविण्यासाठी येत. सगळा विश्वासावर चालणारा व्यवहार. एकदा तो व्यवहार झाला की त्या झाडावरून ओघळून पडलेल्या आंब्याला सुध्दा हात लावायचा नाही हा आजोबांचा दंडक !आम्हा मुलांना तशी सक्त ताकीद असे. "तुम्हाला आंबे खाण्यासाठी खूप झाडे ठेवली आहेत ते आंबे खा . ह्या झाडांवरच्या आंब्यांना हात लावायचा नाही." आजोबांचे फर्मान निघे. त्या झाडांवरून पडलेले आंबे आजोबा वेगळे ठेवत आणि
'दयाशंकर चाचा' आंबे न्यायला आले की त्यांना देत. प्रामाणिकपणाचा पाहिला धडा मी तिथे शिकलो. आजोबा शिक्षक होते. नुसत्या उपदेशाने संस्कार होत नाहीत तर ते एका पिढीच्या वर्तनातून पुढील पिढीत झिरपत जातात ही जाणीव त्यांना होती. मे महिन्याच्या अखेरीस आई मला पुन्हा औरंगाबाद ला घेऊन जाण्यासाठी येई.
तिथून निघताना मी आमच्या वासराच्या, 'छकुल्याच्या' गळ्यात पडून खूप रडे. त्या निरागस जीवाने फार लळा लावलेला असे.
पुढे मी मोठ्या इयत्तेत गेलो. अभ्यास वाढला. उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील कुठले ना कुठले क्लासेस सुरू झाले. हळूहळू आजोळी जाणं कमी होत गेलं
आता आजी-आजोबा हयात नाहीत.कधीतरी एखाद्या समारंभाच्या निमित्ताने तिथे जाणं होतं. एकेकाळी एकत्र खेळलेल्या आणि आता सासुरवाशीणी झालेल्या आम्ही आते- मामे भाऊ बहिण एकमेकाना भेटतो. बालपणीच्या आठवणी निघतात, नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात. आम्ही ज्या वडाच्या झाडाखाली खेळायचो ते झाड आजही तेथे आहे. मी आवर्जून तिथे जातो . झाडाच्या खोडाला, पारंब्याना स्पर्श करतो. झाडाची पाने मग अंमळ जोरात सळसळतात जणू काही तो वयोवृध्द वटवृक्ष म्हणतं असतो ' "ओळखले रे पोरांनो तुम्हाला. माझ्या अंगाखांद्यावर खेळून मोठ्या झालात तुम्हीं. येत जा अधून मधून मला भेटायला. "
आज औरंगाबादच्या धकाधकीच्या जीवनात बाजारात भाजी घेताना, तराजूत पडणाऱ्या भाज्या पहिल्या की डोळ्यासमोर, कारल्याच्या,दोडक्याच्या मांडवात बागडणारी एक अवखळ चिमुरडे आणि त्यांच्या डोक्यात
टपल्या मारणारे दोडके,दुधी असे दृश्य तरळते.
उगाच नाही म्हणत ,
'बालपणीचा काळ सुखाचा' !!
तो सुखाचा काळ,अत्तराच्या कुपितून अत्तर उडून जावे तसा भरभर उडून गेला पण त्या सोनेरी दिवसांचा 'स्मृतीगंध'
अजूनही मनात दरवळतो ...!!!
लेखक - नवनाथ ठोंबरे
संभाजीनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा