माझ्या मनातील सतारीची
हळुवार तार तू
अन काळजाला चिरणारी
हसरी कट्यार तू
ओबडधोबड जिंदगीला
चिऱ्यासारखा आकार तू
बघ युद्धावर निघालोय प्रेमाच्या
माझी ढाल अन तळपती तलवार तू
माझ्या लिखाणातील आशय
ओघवतेपणा अन सार तू
धगधगत्या मनातील
विद्रोहाचा अंगार तू
तुडवतोय समतेच्या वाटा
एकमेव साक्षीदार तू
सारे जग विषमतेने ओसंडून वाहताना
माझा समानतेचा दरबार तू
माझी भक्ती,माझी भावना,माझी साधना
सारं काही अपार तू
माझ्या मनातील अमूर्त ईश्वराचा
मूर्त आकार तू
हे #कविते माझ्या जीवनाचा
उपहार तू
तूच जीवन,तूच मरण,तूच तपश्चर्या
अन माझ्या जीवनाचा अलंकार तू
नवनाथ ठोंबरे