रविवार, १६ जुलै, २०१७

आयुष्याचे पुस्तक


आयुष्याच्या पुस्तकाचे
पुढले पान कोरे आहे,
अंतरीच्या लेखणीने रंगण्याची
वाट पाहत आहे !
सुंदर काव्य-कथा, निसर्ग चित्रणे,
स्वप्नीची नक्षत्र-नक्षी रेखणे आहे,
अंतरीच्या रसिकतेने नटण्याची
वाट पाहत आहे !
पिंपळ पान, गुलाब पाकळ्या,
मोरपीस, पराग जपणे आहे,
अंतरीच्या मायेने गोंजारण्याची
वाट पाहत आहे !
ज्या गत पानांवर अश्रू ठिबकले,
तिथली शाई मिटली आहे.
त्या पानांस का व्यर्थ वाचणे?
विरण्याची वाट पाहत आहे !
                                                                        कवी- नवनाथ ठोंबरे
                                                                              औरंगाबाद

गुरुवार, १३ जुलै, २०१७

तुझे शहानपण.......

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर

अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्वासांनी थांबून जावे
परस्‍परांना त्रास तरीही परस्‍परांविण ना गत्‍यंतर

मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर

भेट जरी ना या जन्‍मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन्‌ तूही मजला सावर सावर

मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर
   

                               नवनाथ ठोंबरे